आजच्या गावांची दैन्यावस्था

साधारण 80 ते 90 च्या दशकात गावाकडे जाण्यासाठी चांगले रस्ते नसत. बैलगाडीचा प्रवास हाच एकमेव आधार होता. गावात एक दोन जणांकडेच फक्त सायकली असायच्या.

देव धर्माला किंवा लग्नकार्याला जायचे असेल तर लोक भल्या पहाटे बैलगाडी जुंपून निघत असत. बैलगाड्या घेऊन डोंगर दर्या ओलांडून लोक इच्छित स्थळी जात असत.

भर दुपारी निवांत एका झाडाखाली बसून बैलगाडीचे बैल सोडून झाला झाडाखाली बांधत. त्यांना आणलेली वैरण खायला घातलेली असे. जवळच झाडाखाली बैलगाडीतून आलेले लोक पंगतीने घरी होऊन आणलेले जेवण करत.

बैल सुद्धा वैरण खाऊन पाणी पिऊन रवंत करीत असत. आणि मग थोड्या वेळाने परत गाडी जुंपून लोक पुढच्या प्रवासाला निघत. असा तो काळ होता.

एकमेकाकडे पाहुणे म्हणून जायचे असेल तर लोक शक्यतो पायीच प्रवास करायचे. पाहुणा आल्यावर घरातील सदस्यांना खूप आनंद व्हायचा.

पाहुणे आल्यावर घराच्या ओटीवर घोंगडी अंथरली जायची. घोंगडीवर बसण्याची मजा वेगळीच होती. घोंगडी वर बसून पितळीतील गुळाचा चहा पिताना एक वेगळाच आनंद व्हायचा.

पाहुणा आला म्हणजे चांगल्या प्रकारे उठबस व्हायची. आजूबाजूची माणसं विचारपूस करायची. सुखदुःखाच्या गप्पा होत असत. त्यामुळे आजूबाजूच्या बातम्या समजत असत. त्या विचारांची शिदोरी घेऊन पावना गावची वाट धरली जात असे.

यात्रांच्या हंगामात तर मोठी धमाल असे. त्या काळात गावागावांमध्ये पहिलवान मंडळी भरपूर होती. दूर गावच्या यात्रेला गेल्यावर पाहुणे किंवा मित्रमंडळी यांच्याकडे जेवणाची आणि राहण्याची सोय व्हायची.

दुसऱ्या दिवशी आखाड्यामध्ये पाहुण्यांच्या आदरपूर्वक कुस्त्या लावायच्या. कुस्ती जिंकली तर चांगले बक्षीस मिळायचे. त्यामुळे या भागातील लोकांच्या दुसऱ्या भागातील लोकांबरोबर ओळखी पाळखी व्हायच्या. त्यानिमित्ताने येणे जाणे व्हायचे. चांगले संबंध निर्माण व्हायचे.   

परंतु आता मोबाईलचा जमाना आला.रस्तेही आता चांगले झाले. संपर्क करणं सहज सोपं झालं. लोकांकडे मोटरसायकली, आणि फोर व्हीलर गाड्या आल्या. त्यामुळे लोक जरी कुणाकडे गेले तरी आता राहायला मागत नाहीत. चहापाणी घेऊन लगेच निघतात. चार सुखदुःखाच्या गोष्टी बोलत नाहीत. 

वेळ नाही असे कारण सांगून लोक निघून जातात. त्यामुळे आता कुणी कुणाकडे शक्यतो येत नाही राहायचे तर दूरच. 

थोडे काही झाले तर माणसाचा ईगो आडवा येतो. कुणी मोठ्या माणसाने चांगला सल्ला दिला किंवा काही अनुभवाच्या गोष्टी सांगितल्या तर 

तुमच्यावेळी ते ठीक होतं. आता नाही 

किंवा तुला काही कळत नाही. असे म्हणून दिलेला सल्ला तरुण लोक धुडकावून लावतात. त्यामुळेच माणुसकी संपत चालली आहे. 

काही संपत्तीच्या, काही मानापमानाच्या तर काही दुसऱ्यांनी भरवलेल्यामुळे निर्माण झालेला अविश्वास आणि एखाद्याचे चांगलं चाललेलं न देखण्याची प्रवृत्ती, वाढलेल्या अपेक्षा आता हे सर्व अडचणीचं झालं आहे. 

त्यामुळे समाज गावकी भावकी तुटत चालली आहे. लोक एकमेकांपासून दूर चालले आहेत. ही समाजात विदारक परिस्थिती पाहायला मिळत आहे.

त्यामुळे जवळची नातीगोती असूनही कोणी कोणाच्या धार्मिक किंवा लग्नकार्यात जायचं किंवा नाही याचा विचार करत आहेत. 

पूर्वी घराच्या अंगणात मांडव असायचा. ज्याच्या घरामध्ये रेडिओ असेल अशा माणसाच्या अंगणात रात्री माणसं एकत्र जमायची. आणि रेडिओवरील कार्यक्रम ऐकत राहायची ती मैफल आता काळाच्या पडद्याआड लुप्त झाली.

गावामध्ये चावडी असायची. चावडीमध्ये गावाच्या विविध विषयावर निर्णय व्हायचे. गावात झालेली भांडण तंटे गाव पातळीवर मिटवले जायचे.

जत्रा यात्रा ठरवण्यासाठी माणसं गावाच्या पारावर बसत असत. यात्रेच्या कार्यक्रमाचे सर्व नियोजन गावकरी या ठिकाणी बसून करत असत.

हे चित्र आता बदलत चालले आहे. 

पूर्वी मोठ्या प्रमाणात शेती केली जायची. लोक एकमेकांना मदत करायचे. प्रत्येकाच्या घरात दहा-बारा माणसे असायची. पंधरा-वीस जनावरे असायची.

परंतु आता लोकांकडे जनावरे राहिली नाहीत. शेतसाठी आता माणसे मिळत नाही. शेत कुणी करायला बघत नाही. मुलं शिकली सर्व शहराकडे पळायला लागली. 

ते गाव प्रत्येकाच्या घरातील माणसे आणि गोठ्यातील ती गुरं ढोरं, दारात असलेली पाळीव कुत्री मांजरं, भरगच्च भरलेला असा गाव आता सुना सुना वाटतोय. 

गावातील बऱ्याच घरांना कुलूपं लागलेली आहेत. लोकाऐवजी आता घरच किंवा ओस पडलेला गावच माणसाची वाट बघत आहे.



पूर्वीचे घरातील माणसांनी भरलेले घर आणि गाव आणि आता कड्या कुलपात अडकलेली घरे आणि ओसाड गाव बघून जीवाची कालवा कालव होते. मन सुन्न होतं. येतील का ते पूर्वीचे दिवस पुन्हा? अशा विचारांनी मनात काहूर दाटत राहते. आणि नकळत माझे हात गावच्या दिशेकडे बघून छातीवर जुळून येतात.

लेखक:- सुदाम बबन मदगे (किवळे ता.मावळ, जि.पुणे)

टिप्पण्या

  1. गावाकडचे तुम्ही केलेले वर्णन वाचून प्रत्यक्ष गावात असल्याचा भास झाला. खरंच ते पूर्वीचे दिवस खूपच छान होते. आता गावाकडे मजा राहिलेली नाही.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अति लाडाने वाया गेलेले पोर

यातनांतून घडलेले लहानपण : तळपेवाडीच्या संघर्षाची आणि यशाची कथा