अति लाडाने वाया गेलेले पोर
म्हातारा म्हातारी पडवीत बसली होती. पडवी कसली हो ती? गोठाच होता. एका बाजूला गुरे बांधण्याची जागा. व दुसऱ्या बाजूला माणसे राहायची.
दोन-तीन भांडी. काही गाडगी, मडकी पाण्याचा एक हंडा, एक दोन डबे व दारात धान्य साठवण्याची कनगुली. त्यावर घडी घालून ठेवलेल्या दोन-चार गोधड्या, शेजारी जुनी घोंगडी एवढाच काय तो संसार.म्हातारा चुलीला पाठ लावून बसला होता. पडवीच्या कोपऱ्यात कुत्र्याचं एक छोटा पिल्लू बसलं होतं. आजींने माझ्या हातात नाचणीची भाकरी व नारळाच्या कवटीत ठेवलेली लसणाच्या चटणीचं बोट भाकरीवरून ओढून मला ती भाकरी खायला दिली होती. मी ती भाकरी खात असता अचानक ते लहान कुत्र्याचे पिल्लू माझ्यापाशी आलं आणि माझ्या हातातील भाकरी ओढू लागले.
मला त्या कुत्र्याच्या पिल्लाचा भयंकर राग आला. मी काठी घेऊन त्याला मारू लागलो. त्यावर ते क्याव क्याव करत त्याच्या जागेवर जाऊन बसले.
तेवढ्यात आजीच बोलली.
अरे बाळा! आपल्याला जसा जीव असतो तसाच त्या कुत्र्याच्या पिल्लालाही जीव असतो. नको मारू त्याला.
म्हातारीने लगेच दुसरा भाकरीचा तुकडा मला दिला.
दुसऱ्या बाजूला माझा मामा राहत होता. त्याच्या पोराने काहीतरी खोड्या केल्या म्हणून त्याला मारत होता.
ते पाहताच म्हातारा उठला आणि मामाला म्हणाला.
किसना कशाला मारतो पोराला?
त्यांने माझ्या मांडीवर घाण केली.
अरे असू दे. लहानच आहे तो अजून. मग काय तू आता मांडी कापतो का?
म्हातारा म्हणाला.
म्हाताऱ्याचं शब्द अंगणात बसलेला दशरथ ऐकत होता. त्याला म्हाताऱ्याचे शब्द चांगलेच कळले होते. आणि त्याने ते तेथे घडलेले दोनही प्रसंग ध्यानात ठेवले.
दशरथ नेहमीच आमच्या अंगणात बसत असे. मलाही ते शब्द लहान असताना काही कळत नव्हते. पण थोडा समजदार झाल्यानंतर त्याचा अर्थ काय होता हे मला कळालं.
पूर्वीची माणसं किती मायाळू होती, किती दयाळू होती होती. व वाटून खाण्याची त्यांची प्रवृत्ती मला जाणवली. परंतु मुलाचे किती लाड करावे यालाही काही मर्यादा होत्या.
कालांतराने दशरथचं लग्न झालं. लग्न होऊनही बरीच वर्ष त्याला मुल बाळ झालं नाही. देव देवस्ती केले. अंगारा धुपारा पाहिला, पण त्यांच्या पोटी मुल झालं नाही.
परंतु पुढे दैवयोगाने कसा बसा सात-आठ वर्षांनी पाळणा हालला. मग तो आनंद, तो कार्यक्रम मला आठवतो. दशरथने सत्यनारायण पूजा घातली. अंगणात जेवणाच्या पंगती घातल्या. लाडू पेढे वाटले.
कालंतराने दशरथचा मुलगा मोठा झाला. वंशाला एकच दिवा म्हणून त्यावेळी त्याचं खुप लाड कोड सुरू झाले. त्याला वाटेल ते व तो मागेल ते आई बाप कष्ट करून मुलाला पुरवत असत. काय हे माहित नव्हतं की माझी आईबाप काय करतात. की काही नाही पण मला वाटते लाड पुरवतात
मुलगा आठवी, नववी, दहावी शिकला. मुलाने मोटरसायकल साठी वडिलांकडे हट्ट धरला. लगेच बापानेही बैल विकून मुलाला गाडी घेऊन दिली. मग काय मुलाची मजा. तो अजूनच मित्रांबरोबर इकडे तिकडे फिरू लागला.
कसाबसा दहावी उत्तीर्ण झाला. कॉलेजला तालुक्याला जाऊ लागला. बापाने त्याची गरीबी त्याला दाखवलीच नाही. त्याला जे लागेल ते पैसा अडका त्याला देत राहिला.
कॉलेजमधील मुलं त्याला विचारू लागली विजय? तुझा बाप तुझे खुप लाड करतो. तुझा आज वाढदिवस आहे. काही तरी आम्हाला पार्टी दे.
मग मुलं आज इकडे उद्या तिकडे अशी एकमेकांकडे जाऊ लागली व जेवणा खावण्याच्या पार्ट्या करू लागली. अशाच या पार्टी आणि इतर वाईट मार्गामुळे या युवकांना गांजा, दारू,आणि सिगरेटची सवय लागली.
त्यावर्षी विजयच्या गावची यात्रा होती. त्याच्या ग्रुप मधली मुलं म्हणाली.
तुझ्या गावच्या यात्रेला जाऊ या.थोडी गावाला मजा करू डोंगर दर्या पाहू नद्या नाल्यांमध्ये पोहू अशा पद्धतीने गावाला जायचं नियोजन झाले.
ग्रुप मधील पाच सहा मुलं गाडी करून गावाला आली. आई बापाला फार आनंद झाला. आईबापांनी कसलीही कसर न ठेवता त्यांची उठबस केली. मुलं फिरून आली आणि मग त्यांच्या गाडीतले व्यसनाचे दारू, गांजा इत्यादी साहित्य बाहेर काढलं. साहित्य कसलं. हे सर्व व्यसनाचे सामान माळावरती घेऊन जाताना विजयने बापाला सांगितलं.
आम्ही येतो थोड्या वेळाने. कोंबडी कापून जेवण तयार करून ठेवा.
गावच्या यात्रेला ग्रामदेवताला पुरणपोळीचे जेवण करायचे असताना सुद्धा रूढी आणि परंपरा मोडून मुलाच्या मित्रांसाठी बापाने कोंबडी कापून जेवण तयार केले.
मुलगा व त्याचे मित्र घरी आले तेव्हा पूर्णतः व्यसनाधीन झाले होते. घरी आल्यावर विजय म्हणाला.
बाबा! केली का जेवणाची सर्व व्यवस्था?
आईने घाबरत पडवी मध्ये सर्व जेवण त्यांना दिले. थोडे फार कमी पडलं. मुलगा लगेच बापावर ओरडला.
का रे! तुला कळत नाही का?
काय ग आई! तुला कळत नाही का? आम्हाला जेवण एवढं कमी कसे.?
दुसरं गोडाचं जेवण आहे ना बाळा अजून. पाहुणेरावळे येतात जेवून जातात. गोड जेवण आहे
आम्हाला ते नको तुझं तिकडं फेकून दे मुलगा ओरडला.
आईने पुन्हा भाकरी केल्या. मुलांना दिल्या मात्र आईच्या मनातील झालेली घुसमट खरच काही तरी चेहऱ्यावर सांगत होती.मुलं जेवली आणि झिंगतच यात्रेच्या कार्यक्रमाला गेली. तिथे पण त्यांची भांडणं झाली. मग काय अजूनच आई बापाला टेन्शन आलं. ती दोघे कोपऱ्यात रडत बसली.
तेवढ्यात म्हातारा म्हणला.
दशरथ कशाला रडतो आता. तो लाडाचा मुलगा आहे तुझा. मुलगा कसा का असेना. पण तो मुलगा शेवटी तुझ्या वंशाचा दिवा आहे.
त्याला त्या क्षणी माझ्या आजोबाचे शब्द आठवले. अग पोरांनी मांडीवर घाण केली की मांडी कापणार आहे का तू.?
त्याची बायको शांत झाली व पुन्हा सकाळी त्याच जोशात सर्व मुलांची उठबस केली.
विजय व त्याच्या बरोबर आलेली मुलं दुसऱ्या दिवशी तालुक्याला जायला निघाली. बाप गुपचूप मुला जवळ गेला व कुणाकडून तरी उसने घेतलेले तीन हजार रुपये विजयच्या हातात दिले.
वास्तविक हे ओळखता आलं पाहिजे, समजलं पाहिजे वेळीच दाब दडप असायला पाहिजे. पण उगाच काही नको म्हणून शांत राहणं अशा भावनेने ती दोन्ही माणसं जगत होते.
पुढे मुलगा मोठा झाला त्याला नोकरी काही मिळाली नाही. कुठे कंपनीत किंवा खाजगी नोकरी काही त्याने बघितली नाही. व घरच्या शेतीकडेही लक्ष दिले नाही.
शेवटी तो असाच इकडे तिकडे फिरू लागला. येव्हांना आई बाप वयस्कर झाले. चैनीसाठी मग त्याने दादागिरी करून जमीन विकली. गुरु ढोरं विकली. मंग पुढे काय ते आपल्याला समजले असेलच. त्यामुळे वेळीच सावरा आणि आधुनिक काळात आपापल्या मुलांना यांना योग्य मार्ग दाखवा.
लेखक:- सुदाम मदगे (किवळे)


अप्रतिम असा लेख
उत्तर द्याहटवाछान आहे
उत्तर द्याहटवाखूप छान लेखन केले आहे. लेख वाचून अतिशय वाईट वाटले.
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाखरंच सत्य परिस्थिती मांडली आहे.
उत्तर द्याहटवा