अमोल पालेकर सर्वसामान्यांचा हिरो

अमोल पालेकर.



अमोल पालेकर यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९४४ रोजी मुंबईतील कमलाकर आणि सुहासिनी पालेकर यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. पालेकरांच्या कुटुंबाचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नव्हता. त्यांचे वडील पोस्ट ऑफिसमध्ये तर आई एका खासगी कंपनीत कामाला होती.

पालेकर यांनी आपल्या कारकिर्दीला मुंबईतील प्रसिद्ध कॉलेज जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून कलाकार म्हणून सुरुवात केली. 

अमोल जेजे स्कूल ऑफ फाइन आर्ट्समध्ये प्रवेश घेतला तेव्हा त्यांनी आपला खर्च भागवण्यासाठी टायपिंग शिकवले. पदवीनंतर अनेक ॲड एजन्सी मध्ये काम केले. त्यानंतर त्यांना बँकेत कारकूनाची नोकरी लागली, त्यामुळे दिवसा बँकेत काम आणि रात्री रंगकाम करायचे.

मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करणारा कलावंत ते संवेदनशील दिग्दर्शक असा अमोल पालेकर यांचा प्रवास आहे. सत्तरच्या दशकांत आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना रिझवले.

सत्तरच्या दशकात एकीकडे अमिताभ बच्चन यांच्या रूपाने अँग्री यंग मॅन उभा रहात होता. त्याचवेळी देशात मध्यमवर्गही वेगाने वाढत होता. 

या वर्गाचे प्रतिनिधित्व करणारा नायक नव्हता. अमोल पालेकर यांनी ही गॅप भरून काढली. त्यांची बोलण्याची शैली, विनोदी शैली आणि भावनिक शैलीही वैशिष्ट्यपूर्ण होती. अमोल पालेकर सिच्युएशनल कॉमेडीसाठी प्रसिद्ध होते.

पालेकर यांचा नायक थोडासा बावळट, घाबरट परंतु, सरळ- साधा व मनाने निरागस होता. तेव्हाच्या मध्यमवर्गीय तरूणांना पालेकर यांच्या पात्रात कोठेतरी आपण फिट बसत असल्याचे जाणवत असे. 

त्यातूनच आलेले त्यांचे चित्रपट गाजले. रजनीगंधा, गोलमाल, रंगबिरंगी, नरम गरम, बातो बातो मे, चितचोर, दामाद, घरौंदा, छोटी सी बात, मेरी बिबी की शादी, खामोश हे त्यांचे काही चित्रपट. 

गोलमाल हा त्यांचा अविस्मरणीय विनोदी चित्रपट आहे. घरौंदामध्ये मुंबईत घर घेऊन लग्न करणार्‍या जोडप्याची कथा आहे. 

हे चित्रपट मध्यमवर्गाला अपील करणारे ठरले. अमोल पालेकरांचा एक ब्रँड तयार झाला होता. उत्कृष्ठ संगीत व गीते यामुळे त्यांचे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

"शांतता कोर्ट चालू आहे” या नाटकातील काम बघून बासू चॅटर्जीनी पालेकर यांना त्यांच्या सिनेमात काम करण्याची ऑफर दिली तेंव्हा त्याने त्यांना चक्क नकार दिला. तो सिनेमा होता “पिया का घर"

त्यानंतर परत बासूदानी अमोल पालेकर यांनी मनू भंडारीच्या "यही सच है” या कादंबरीवर आधारित "रजनीगंधा” हा सिनेमा ऑफर केला. 

१९७४ साली आलेला हा चित्रपट “सुपर डूपर हिट” ठरला. मग बासुदांच्याच "छोटी सी बात" सिनेमातून अमोल पालेकरला "स्टार” ची ओळख मिळाली.

"छोटी सी बात" चित्रपटाची कथा अतिशय साधी, कोणाच्याही आयुष्यात घडणारी. 

अरुण प्रदीप (अमोल पालेकर) असं दोन नाव असलेला, नाकासमोर चालणारा एक मध्यमवर्गीय स्वप्नाळू तरुण आपलं प्रेम मिळवण्यासाठी बऱ्याच खटपटी करत असतो. 

अरुणचं प्रेम असतं प्रभा (विद्या सिन्हा) नावाच्या तरुणीवर जी याचं आपल्यासाठी झुरणं मस्त एन्जॉय करत असते पण मनोमनी कुठेतरी तिला तो आवडलेला पण असतो. 

सिनेमांत खरा द्विस्ट येतो जेंव्हा नागेश शास्त्री (असरानी) हा स्ट्रीट स्मार्ट तरुण कबाब में हड्डी बनून प्रेम कथेत घुसतो. त्याची स्टाईल, रुबाब आणि प्रभाची त्याच्याशी मैत्री बघून अरुण अस्वस्थ होतो. नाना उपाय करून थकलेला अरुण शेवटी आपलं सामान गुंडाळून दाखल होतो, 

खंडाळ्यातल्या कर्नल जुलियस नागेंद्रनाथ विल्फ्रेड सिंग (अशोक कुमार) असं लांबलचक नाव असलेल्या लव्ह गुरु कडे. हा कर्नल अरुणचं प्रेम मिळवायला कशी मदत करतो ही या सिनेमाची कथा.

नायक म्हणून वेगळा ट्रेंड सेट केल्यानंतर परिपक्व वयात त्यांनी आपला मोर्चा दिग्दर्शनाकडे वळविला. 

त्यांनी दिग्दर्शन केलेल्या पाच चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले दिग्दर्शक म्हणून त्यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले आणि काही मालिकांचे दिग्दर्शनही केले. 

वेगळे विषय मांडणे ही त्यांची खासीयत. म्हणूनच अनेक वर्षांपासून वाचलेली व मनात राहिलेली व्यंकटेश माडगूळकरांची बनगरवाडी ही कादंबरी त्यांनी पडद्यावर आणली. तिचे खूप कौतुक झाले.

कुटुंबनियोजनात मोलाचे कार्य करणार्‍या व उपेक्षित राहिलेल्या र. धो. कर्वेंच्या जीवनावर काढलेला ध्यासपर्व हा चित्रपटही समीक्षक व अभिजात प्रेक्षकांची कौतुकाची पावती मिळविणारा ठरला. 

जीए. कुलकर्णींच्या कथेवर आधारीत कैरी हा चित्रपटही हटके होता. पहेली, दायरा, अनाहत, आक्रीत हे त्यांचे इतर चित्रपट. नियोगाचा विषय घेऊन काढलेला अनाहतही चर्चेचा ठरला. 

स्त्रियांच्या भावनांच्या अभिव्यक्तीला शेवटी बंडखोरीचे रूप देणारी नायिका त्यांनी यात रंगवली. 

धाडसी विषय घेवून अभ्यासपूर्ण मांडणी करणे यात त्यांचा हातखंडा आहे. विषयाची संयत, संवेदनशील मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य. म्हणूनच मध्यंतरी केलेल्या एका पाहणीत सर्वोत्कृष्ट दहा दिग्दर्शकात त्यांचा समावेश करण्यात आला होता.

पालेकरांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा हिंदी चित्रपट 'पहेली' होता. शाहरुख खान आणि राणी मुखर्जी अभिनीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. 

'पहेली'ला ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट श्रेणीत भारतीय प्रवेश घोषित करण्यात आला असला तरी, या चित्रपटाला पुरस्कार मिळाला नाही.

अमोल पालेकर यांनी सुमारे दीड दशक बॉलिवूडमध्ये काम केले, जवळपास ४० चित्रपट केले परंतु त्यांना नायक म्हणून फक्त एकदाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार त्यांना १९८० मध्ये 'गोलमाल' चित्रपटासाठी देण्यात आला होता.

अमोल पालेकर यांचे पहिले लग्न चित्रा यांच्याशी झाले होते पण २००१ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. दोघांचे लग्न 1969 मध्ये झाले आणि ते 32 वर्षे टिकले. 

घटस्फोटानंतर पालेकर यांनी २००१ मध्ये संध्या गोखले यांच्यासोबत लग्न केले. पालेकर हे दोन मुलींचे वडील आहेत.

अमोल पालेकर २०२४ साली 'फर्जी' आणि 'गुलमोहर' या वेबसिरीजमध्ये पात्र कलाकार म्हणून दिसले.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अति लाडाने वाया गेलेले पोर

यातनांतून घडलेले लहानपण : तळपेवाडीच्या संघर्षाची आणि यशाची कथा

आजच्या गावांची दैन्यावस्था