पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अंगारा बुकारा – अंधश्रद्धेवर आधारित हृदयस्पर्शी कथा | समाजासाठी जागृती

इमेज
दामूचं कुटुंब गाव सोडून एमआयडीसी एरियामध्ये कामाला गेलं. त्याला एक मुलगी, एक छोटा मुलगा आणि बायको असं छोटंसं कुटुंब. एका लहानशा भाड्याच्या खोलीत ते राहू लागले.  दामूला फार मोठा पगार नव्हता; आठ-दहा हजार रुपयांची नोकरी. त्यात घरभाडं, मुलांचं शिक्षण, रोजचा खर्च आणि कधी वेळ मिळाला तर गावाकडच्या म्हाताऱ्या आई-वडिलांना दोन पैसे मदत अशा तगड्या कसरतीत त्याचं आयुष्य चाललं होतं. गावची जत्रा आली म्हणून दामू मुलाबाळांना घेऊन गावी आला. मुलं दिवसभर इकडे-तिकडे फिरायची. म्हातारी वारंवार सांगायची, “त्या चिंचेच्या झाडाखाली जाऊ नका, तिथं जागा बरोबर नाही.  ओढ्याच्या विहिरीजवळ जाऊ नका.” पण लहान मुलं कधी बेडक्या मारायला, कधी चिंच पाडायला सकाळ, दुपार, संध्याकाळ तिकडे जायचीच. असंच एक दिवस दामूचा छोटा मुलगा दुपारी एकटाच चिंचेच्या झाडाखाली गेला. तिथे त्याला कसला तरी आवाज आला. तो घाबरून पळत घरी आला. म्हातारीच्या मनात लगेच शंका आली “पोराला काहीतरी बाधा झाली. सटवाईने धरलं की भूत लागलं!” घरात धावाधाव सुरू झाली. दामू आणि त्याची बायको घाबरून गेले. मुलगा तापाने फणफणत होता. काय करावं, कुणाकडे जावं त्यांना काही...

🌳 जंगलातील आग

इमेज
मनुष्य कुटुंबामध्ये सुख–समृद्धी चालू असते, सर्वत्र आनंद असतो. मग ते मनुष्य असोत, प्राणी असोत किंवा पशुपक्षी प्रत्येक जीव सुखी आणि आनंदी राहावा हीच आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. आपल्याला जसा जीव प्रिय आहे, तसाच प्रत्येक प्राण्यालाही त्याचा जीव प्रिय असतो. आमची आजी आम्हाला नेहमी सांगायची, “ताटातील भाकरीचा तुकडा जेवताना आपल्याकडे पाहत असलेल्या कुत्र्याला टाकायलाच हवा.” जुन्या लोकांची ही शिकवण माणुसकीची होती. बैल काम करत असताना त्याला मारू नका, त्याला चारा–वैरण द्या. गाई–म्हशींची सेवा करा. गोरगरिबांना मदत करा. उगाच अहंकार करू नका. खोटं नाटक करू नका. कष्टाने जे मिळेल त्यात समाधान मानून जगा अशी शिकवण आपल्याला पूर्वजांनी दिली आहे. आपल्याला पाणी मिळते ते पावसामुळे. पाऊस कधीच आपल्याकडे त्याच्या पाण्याचे पैसे मागत नाही. तो चार महिने मनसोक्त बरसतो, नद्या–नाले वाहू लागतात आणि आपल्याला जीवन देतात. त्याच्या प्रेमाचा वर्षाव कधीच कमी पडत नाही. जमीन ही आपली माता आहे. आपले पंजोबा–खापर पंजोबा सांगून गेले “पोरा, जमिनीचा तुकडा विकू नको. तिची मशागत कर, तिची जोपासना कर. तीच तुझी लक्ष्मी आहे,  उदरनिर्वाह द...

जळलेलं लाकूड – वृद्ध आई-वडिलांच्या वेदनांची हृदयस्पर्शी ग्रामीण कथा

इमेज
तुक्याचं लग्न झालं आणि तुकाराम व त्याची बायको पारी मोठ्या आनंदाने संसार करू लागले. छोटंसं पण सुखानं भरलेलं त्यांचं घर होतं.  एक मुलगी आणि एक मुलगा दोघांमुळे घरात सतत किलबिलाट, हशा आणि उत्साह असायचा. जीवन अगदी भरून वाहत होतं. सुख, समाधान आणि माणुसकीने त्यांचं अंगण नेहमी गजबजलेलं असायचं. तुक्याची परिस्थिती चांगली होती. कधी कोणतीच कमतरता भासली नाही. गावातील लोक आनंदाने त्याच्या दारात येऊन बसायचे. तुक्याच्या घरात आलेला माणूस चहा-पाणी घेतल्याशिवाय परत जात नसे.  दुसऱ्या गावची माणसंही इकडे-तिकडे जाताना तुक्याच्या दारातूनच जायची. कोणताही पाहुणा आला की तुका, पारी किंवा त्यांची मुलं आनंदाने विचारपूस करायची  “कुठल्या गावचे आहात? पाणी-सावनी घेऊन जा. थोडं बसा अंगणात.” घरात चुलीवर कायम भाताचा टोप, बेसन किंवा कालवण तयार असायचंच. दोन माणसं आली तरी त्यांना भात, भाकरी, कधी दूध तर कधी कालवण घालून प्रेमाने जेवू घालायचे. ही त्यांची सवयच होती. त्यांच्या या उदार स्वभावामुळे देवानेही त्यांना कधी कमी पडू दिलं नाही. काळ पुढे सरकत गेला. मुलं मोठी झाली. मुलीचं लग्न थाटामाटात केलं. चांगल्या शिक्षित घ...

जंगलातील आठवणी एक ग्रामीण अनुभव

इमेज
काल गावच्या चावडीसमोरील झाडाच्या कठड्यावर आठ-दहा माणसं बसली होती. आदल्या रात्री लव्हऱ्या व कोकात्री (जंगली कोंबडा) यासाठी लावलेल्या फास्यात काही पडलंय का, हे पाहण्यासाठी सकाळीच मी आणि शांत्या तिकडे गेलो. तर भाताचं पळंज पूर्ण खाऊन हे जंगली चतुर पक्षी निघून गेले होते.  मात्र दुसऱ्या एका सापळ्यात एक कोकात्री अडकली होती. ती पिशवीमध्ये टाकली. तरीही आमचं समाधान झालं नाही. म्हणून शांत्या आणि मी पडीक डोंगरातील ओढ्यावर गेलो आणि तिथं गिरणी दळू लागलो. (गिरणी म्हणजे खडकावर नारळाच्या कवट्या घासून आवाज करणे) हा आवाज ऐकून खेकडे बिळातून बाहेर येतात. गिरणी दळताना दोन-चार खेकडे मिळाले; मात्र त्या आवाजाने आमच्या समोर एक मोठा साप येऊन उभा राहिला. त्याला बहुधा वाटलं असावं की बेडूकच आहे, म्हणून तो तिकडे आला असावा. आम्ही धूम ठोकली. आम्ही पळालो. परत त्याच ओढ्याला एक साठलेलं पाण्याचं डबकं होतं. त्या डबक्यात मासे होते. मग काय, आम्ही लगेच आजूबाजूच्या जंगलातून गोळूचा पाला व माशांना झिंगवणारा जंगलातील पाला आणला.  साठलेल्या पाण्याच्या डोहामध्ये पाला दगडावर वाटून टाकला. दुपारी ऊन पडलं आणि त्या पाल्याच्या नश...

आता कसं होणार? — भाग २

इमेज
मित्रहो, या कथेतला पहिला भाग आपण पाहिला. सावकाराच्या कर्जाला कंटाळून शेतकरी धोंडू आणि त्याच्या पत्नीने आत्महत्या केली. त्या दुर्दैवी घटनेनंतर त्यांच्या मुलाच्या आयुष्याची खरी झुंज सुरू होते… धोंडूला सुरेश नावाचा एक मुलगा होता. तो दहावी–बारावीमध्ये शिकत होता. आई-वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच तो शाळेतून गावाकडे धावत आला. घरात शोककळा पसरली होती. सुरेश आजीच्या पाया पडला, रडला… पण काही वेळाने त्याला जाणवलं आता इथे थांबून काही होणार नाही. चुलत काका धक्क्याने जवळपास बधिर झाले होते. घरातील परिस्थिती बिकट होती. शेवटी सुरेशने ठरवलं काहीतरी काम करायला हवं. तो गावच्या पाटलांकडे गेला. “पाटील साहेब, मी आता काय करू?” सुरेशने विचारलं. पाटील म्हणाले, “तू तालुक्याला जा. तुझी कागदपत्रं काढ. मी तुझी नोकरी लावायचा प्रयत्न करतो.” सुरेश आशेने तालुक्याकडे निघाला. पण तालुक्यात त्याचं कोणी नव्हतं. तो स्टेशनवरच राहू लागला. राजकीय सभेचा प्रभाव त्याच दिवशी तालुक्यात एका मोठ्या राजकीय नेत्याची सभा होती. सुरेश गर्दीत उभा राहून भाषण ऐकत होता. “तरुणांनो, शिका! मोठे व्हा! समाजसेवा करा! जंगल वाचवा, पाणी वाचवा, देश घडव...

मुक्यांची कैफियत

इमेज
रामायणामध्ये आपण वाल्या कोळीची कथा ऐकलेली आहे. वाल्या कोळी दिवसा ब्राह्मण, जोशी, ऋषी आणि प्रवासी यांना अडवून मारहाण करून त्यांच्याकडील वस्तू लुटायचा आणि त्यावरच आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवायचा. एकदा एका ऋषींनी त्याला विचारले, “हे पाप का करतोस?” वाल्या म्हणाला, “माझ्या बायको-मुलांसाठी.” तेव्हा ऋषींनी शांतपणे विचारले, “जर तुला या पापाची शिक्षा झाली, तर तुझी बायको-मुलं त्या दुःखात सहभागी होतील का?” वाल्या आत्मविश्वासाने म्हणाला, “नक्की होतील.” ऋषींनी त्याला सांगितले, “ठीक आहे, वेळ आली तर अनुभव घे.” आणि ते पुढे निघून गेले. संध्याकाळी घरी जाताना वाल्याच्या हाताला विंचू चावला. तो वेदनेने तडफडत घरी गेला आणि बायकोला म्हणाला,  “या वेदनेचा अर्धा भाग तू घे.” बायको म्हणाली, “हे कसं शक्य आहे? तुझं दुःख तूच सहन कर.” क्षणात वाल्याला त्या ऋषींचे शब्द आठवले. त्याला सत्य समजले. तो पुन्हा त्या ऋषींकडे गेला, रामनामाचा मंत्र घेतला आणि पुढे तोच वाल्या ‘महर्षी वाल्मिकी’ झाला. आपण माणसं आहोत. पण माणसांइतकीच समज, प्रेम आणि निस्वार्थ साथ देणारे आपले खरे सोबती म्हणजे मुके प्राणी. कुत्रा, शेळ्या-मेंढ्या, क...

हृदयाचा टाहो

इमेज
ग्रामीण आणि डोंगरदऱ्यातील जीवन किती कठीण, किती खडतर आणि किती धोकादायक असतं, हे शहरातील आरामदायी खुर्चीत बसून कधीच समजत नाही.  दुर्गम भागात आजही अशी अनेक गावं आहेत, जिथे गाडी पकडण्यासाठी लोकांना दहा-पंधरा किलोमीटर पायी चालत जावं लागतं.  दूध द्यायचं असो, मुलांना शाळेत सोडायचं असो, एखाद्याला दवाखान्यात न्यायचं असो किंवा बाळंतपणाची वेळ असो प्रत्येक गोष्ट ही संघर्षाचीच असते. कधी कधी घरात भाकरीचा तुकडा असतो, पण त्याला चटणी नसते; कालवण तर दूरच राहिलं. संध्याकाळी काय शिजवायचं हा रोजचा प्रश्न असतो. जंगलातून मिळेल ते कधी खेकडे, कधी एखादी भाजी त्यावरच दिवस ढकलायचे. पाण्यासाठी तर तीन-चार कोस पायी जावं लागतं. त्या पाण्यावरच संपूर्ण दिवसाचा संसार उभा असतो. ही केवळ कल्पना नाही; हे वास्तव आहे. असंच एक चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं आणि मन गहिवरून आलं. पडलेलं घर… ना व्यवस्थित छप्पर, ना अंगण. अंगणात दोन-तीन शेळ्या. आणि दारात बसलेली एक आजी तिची नजर हजारो शब्द बोलून जात होती. माहिती घेतली तर कळलं, त्यांचा मुलगा शहरात कामासाठी बाहेर आहे. आणि ही म्हातारी जोडी डोंगरातल्या जुन्या पडवीच्या घरात आपलं उरले...

पोटाची खळगी – पूर्वजांचा संघर्ष, कष्ट आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी कथा

इमेज
पूर्वीच्या पिढ्यांचा विचार केला, तर किती पिढ्या आल्या आणि किती गेल्या हेच कळत नाही. अनेकांना शहर कसं असतं याची कल्पनाही नव्हती.  त्यांचं अख्ख आयुष्य दगड-माती, शेतीची कामं, बांध घालणं, विहिरी खणणं, लाकूड-फाटा गोळा करणं, गुरंढोरं वळणं अशा कष्टांमध्येच गेलं.  पण त्या काळातील अन्न कसदार, दमदार आणि चविष्ट होतं. आजही ७०-८० वर्षांचे अनेक ज्येष्ठ लोक तरुणांना लाजवतील इतकं काम करतात. आज पैसा आला, गाड्या-घोडे आले; पण कसदार अन्न दूर झालं. भाजीपाला, दूध, दही, तूपही पूर्वीसारखं चवदार मिळत नाही.  पूर्वी साधनसामग्री नव्हती, पण माणसं सुखी, समाधानी आणि आनंदी होती. “देवाने दिवस दाखवला” या भावनेतून मिळेल त्यात दिवस काढत, पोटाची खळगी भरत आणि आनंदाने जीवन जगत. बालपणातील आठवण लहानपणी आम्ही कोहिंडे येथील शाळेत शिकत होतो. त्या गावातील बबन मोहन मुंबईत काम करायचा. काम कसले तर मुंबईचा “मवाली”!  त्यांची चार-पाच जणांची टोळी वेगवेगळ्या हेराफेरीच्या कामात असायची. एखादा पुरुष साडी नेसून मोठ्या सोसायट्यांमध्ये जाऊन लोकांना गंडवायचा. यात्रेच्या वेळी ते गावाला आले की आम्ही लहान मुलं त्यांच्याकडे बघतच ...

गुण्यागोंदाने नांदणाऱ्या गावाची आणि धोंडूच्या आयुष्याची शोकांतिका

इमेज
एकेकाळी आमचं गाव गुण्यागोंदाने नांदत होतं. दवंडीकारांनी दवंडी पेटवली की सगळं गाव चावडीवर जमा व्हायचं. त्या वर्षी गावच्या पाटलांनी जाहीर केलं होतं की, “जो शेतकरी यावर्षी सर्वांत चांगली शेती करेल, त्याला बक्षीस दिलं जाईल.” धोंडूकडे फारशी जमीन नव्हती. थोडीशीच शेती, पण त्या जमिनीवर त्याने रक्ताचं पाणी करून कष्ट केले.  निसर्गानेही त्याला साथ दिली आणि शेती बहरली. कार्यक्रमात पाटलांच्या हस्ते धोंडूला बक्षीस देण्यात आलं. तो दिवस त्याच्या आयुष्यातला अभिमानाचा क्षण होता. पण गावात जळावू वृतीच्या लोकांची कमी नसते. धोंडूला मिळालेलं बक्षीस काही लोकांना सहन झालं नाही.  एका उच्च वर्णातील जमीनदार आणि एका सावकाराने कपटीपणाने त्याला फसवण्याचा डाव आखला. ते धोंडूच्या घरी गेले. मनात कपट ठेवून गोड बोलू लागले. “अरे धोंडू, पाणी नसतानाही तू शेती फुलवलीस. तुझ्याकडे जर विहीर असती, तर काय कमाल केली असतीस!” धोंडू नम्रपणे म्हणाला, “दादा, एक बैलजोडी, घरी म्हातारी आई, दारुडा भाऊ… या परिस्थितीत मी विहीर कशी खोदणार?” त्यावर एक जण लगेच बोलला, “अरे, पैसे सावकार देतील ना!” धोंडू आधी नकार देत होता. “सावकार...

लहानपणाच्या आठवणी आणि खऱ्या देशसेवकांची ओळख

इमेज
लहानपणी आजोबांच्या मागे मागे बिना चपलाच “टुना-टुना” उड्या मारत गावोगावी फिरणं, ते दिवस आजही डोळ्यांसमोर जिवंत आहेत.  एखाद्या दुकानासमोर आजोबा मला बसवायचे आणि दुकानदार कागदात शेंगदाणे व गूळ द्यायचा. ते शेंगदाणे-गूळ म्हणजे जणू सोन्याहूनही मौल्यवान भेट असायची. ते खाताना जो आनंद मिळायचा, तो शब्दांत मांडणं कठीण आहे. पण काळ बदलला, दिवस बदलले. पूर्वीचे दिवस आता राहिले नाहीत. पूर्वी आणि आताच्या जीवनशैलीत जमीन-अस्मानाचा फरक जाणवतो. पूर्वी गावामध्ये बारा बलुतेदारी पद्धत अस्तित्वात होती. समाजातील प्रत्येक घटकाला ठरावीक जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या.  कोळी, ब्राह्मण, सावकार, मोची, शिंपी, सुतार, गवंडी, कामकरी, शेतकरी, दवंडीकार, पुजारी अशा विविध समाजघटकांनी आपापली कामे प्रामाणिकपणे पार पाडायची.  त्या कामाचा मोबदला रोख पैशांत नव्हे, तर पिकलेल्या धान्याच्या स्वरूपात दिला जायचा. आजही ग्रामीण भागातील काही ठिकाणी या परंपरेचे अवशेष पाहायला मिळतात. ग्रामीण भागाकडे पाहिलं तर आजही अनेक माणसं पोटापाण्यासाठी मिळेल ते काम आनंदाने करताना दिसतात.  देशसेवा करणारा सैनिक, गावोगावी पत्र पोहोचवणार...